औरंगाबाद । औरंगाबाद शहर वाहतूक शाखेकडून आज एक 24X7 हेल्पलाईन मोबाईल आणि व्हाट्सअॅप (WhatsApp) नंबर सुरू करण्यात आला आहे.

औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक वेळा वाहतुकीच्या संबंधात वाहतुकीच्या समस्या उद्भवतात. रस्त्यात होणाऱ्या लहान-मोठ्या अपघातामुळे अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होते. याबाबत तसेच वाहतुकीसंदर्भात जनतेतून अनेक लोकांना काही सूचना किंवा तक्रारी करण्यासाठी कुठे संपर्क करावा याबाबत संभ्रम होतो.

त्यासाठी औरंगाबाद शहराचे वाहतूक विभागाचे नियंत्रण कक्षात वाहतुकी संदर्भातील हेल्पलाइन म्हणून मोबाईल नंबर 7030342222 हा ठेवण्यात आला आहे. या मोबाईल नंबर वर जनतेतून कोणीही कॉल करून, एसएमएस करून किंवा व्हाट्सअॅप मेसेज करून शहरातील किंवा त्यांचे परिसरातील वाहतुकीचे संदर्भातील समस्या, सूचना किंवा तक्रारी करू शकतात. या क्रमांकावर प्राप्त झालेल्या सर्व तक्रारीबाबत शहानिशा करून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल आणि तक्रारदारास केलेल्या कारवाईबाबत अवगत करण्यात येईल.

सदर वाहतूक हेल्पलाइन क्रमांक 7030342222 हा सतत दररोज 24 तास म्हणजेच 24 X7 कार्यरत राहणार असून जनतेनी याद्वारे वाहतूक समस्या विषयी सूचना व तक्रारी असल्यास सदर मोबाईल क्रमांकावर कॉल करून, एसेमेस करून, किंवा व्हाट्सअॅप मेसेज करून शहरातील वाहतुकीचे संदर्भातील समस्या, सूचना किंवा तक्रारी कराव्यात व शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन औरंगाबाद शहर पोलीस वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी केले आहे.