औरंगाबाद : औरंगाबाद शहराचा सर्वांगिण विकास व्हावा म्हणून शासनस्तरावर व स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विविध विकास कामे व प्रकल्प सुरु आहेत. औरंगाबाद शहराच्या मध्यभागी असलेल्या सुभेदारी गेस्ट हाऊस समोरील खुल्या जागेवर ओपन ऑडिटोरिअम अथवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन हॉल बनविण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी उद्योग आणि खनिकर्म मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांचेकडे केली आहे.
सुभेदारी गेस्ट हाऊस समोर खुली जागा असुन सदरील जागेचा वापर कचरा व घाण टाकण्यासाठी होत आहे. अशा निसर्गरम्य जागेवर घाणीचे साम्राज्य असुन कचऱ्यांचे ढिग पडलेले आहे. दुर्गंधीमुळे सुभेदारी गेस्ट हाऊस मध्ये येणारे पदाधिकारी, अधिकारी, सर्व सामान्य नागरीक तसेच परिसरालगत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे.
सदरील जागेवर ओपन ऑडिटोरिअम अथवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन हॉल जिल्हा नियोजन समिती (डिपीडीसी) निधीतुन बनविण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी आणि खनिकर्म मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई व जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांचे कडे पत्राव्दारे केली आहे.