औरंगाबाद |  शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी योग्य उपचार आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर अवघ्या सातच दिवसांत कोरोनावर मात केली आहे. 16 डिसेंबर रोजी त्यांची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. 9 डिसेंबर रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी सिग्मा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.

खासदार असताना चंद्रकांत खैरे यांनी अथक परिश्रम घेत औरंगाबादकरांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी समांतर योजना आणली होती. या 1680 कोटी रुपयाचे पाणीपुरवठा योजनेचे 12 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते थाटात भूमिपूजन समारंभ पार पडले. परंतु 9 डिसेंबर लाच शिवसेना नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ते या कार्यक्रमास हजर राहण्यास मुकले.

सिग्मा हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झाल्यावर चंद्रकांत खैरे यांनी सांगितले की, माझ्या प्रकृतीची शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांनी आस्थेने विचारपूस केली. आजारपणात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे धीर देणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे.

यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, अ‍ॅड. आशुतोष डंख, युवासेना जिल्हा युवाधिकारी तथा माजी नगरसेवक ऋषिकेश खैरे, माजी नगरसेवक सचिन खैरे, कमलेश झवेरी, डॉ. उन्मेष टाकळकर, डॉ. ज्ञानेश्वर झडे, डॉ. रोठे, आदींची उपस्थिती होती. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातील सर्व जनता व तमाम शिवसैनिक यांनी केलेल्या प्रार्थना व दिलेल्या शुभेच्छासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आभार मानले.