औरंगाबाद । जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या दिवशी आरोग्य विभागातील 647 अधिकारी, कर्मचा-यांना कोरोनाची लस देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

आज सकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत बन्सीलाल नगर येथील आरोग्य केंद्रावर कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी खासदार डॉ भागवत कराड, आमदार अतुल सावे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉ नीता पाडळकर व जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी, डॉक्टर, अधिपरिचारीका, कर्मचारी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोनाच्या लसीकरणासाठी आज पहिल्या दिवशी ग्रामीण भागातील सिल्लोड (79), पाचोड (46), अजिंठा (54)आणि वैजापूर (33) आणि शहरातील घाटी (74), सिडको एन 11 (81), सिडको एन आठ (80), बन्सीलाल नगर (81), सादात नगर (69), भीम नगर (50) येथील केंद्रावर एकूण 647 आरोग्य सेवकांना कोरोनाची लस देण्यात आली.

जिल्ह्यात कोरोनाची लस देण्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वात महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेळके, डॉ विजयकुमार वाघ यांच्यासह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने परिश्रम घेऊन ही लसीकरणाची मोहिम यशस्वीपणे पार पाडली.