औरंगाबाद | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखणे आणि युरोपियन देशात सापडत असलेल्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महानगरपालिका हद्दीत 22 डिसेंबर पासून 5 जानेवारी पर्यंत रात्री अकरा वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याचे सोमवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते.

राज्य शासनाच्या आदेशानुसार आज औरंगाबाद शहर पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी कलम 144 क्रिमिनल प्रोसीजर कोड अन्वये संचार बंदी चे आदेश काढले. परंतु या आदेशात त्यांनी महानगरपालिका क्षेत्रासह छावनी, वाळूज महानगर आणि त्यांच्या हद्दीतील खेड्यापाड्यात सुद्धा संचारबंदी लागू केली आहे.

पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्या स्वाक्षरीनिशी मंगळवारी काढण्यात आलेल्या संचार बंदी च्या आदेशात औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या संपूर्ण हद्दीत ही संचार बंदी लागू करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील छावणी, एमआयडीसी वाळूज, वाळूज, दौलताबाद व इतर दोन-तीन पोलीस स्टेशन च्या हद्दीत औरंगाबाद महानगरपालिका हद्दीच्या बाहेरील अनेक खेड्यापाड्यांचा, कँटोन्मेंट आणि वाळूज महानगराचा समावेश होतो.

या संचारबंदीचे काळात अत्यावश्यक सेवा आणि आवश्यक काम करणाऱ्या व्यक्तींना सूट देण्यात आलेली आहे.