औरंगाबाद | नव्या श्रमिक कायद्यात केंद्र सरकारने पत्रकारांची गळचेपी केली असून आंदोलन करण्याचा अधिकारही हिरावून घेतलेला आहे. या कायद्याविरोधात नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्रने मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाची दखल घेत केंद्र सरकारला इशारा दिला होता.

आता एनयूजेएमने उद्या मराठवाडास्तरीय बैठकीचे आयोजन बीड येथे केले आहे. एनयूजेएमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष शीतल करदेकर या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत.

सरकारने श्रमिकांचे हक्क मोडून करणारा कायदा लागू केला आहे. त्यामुळे आता पत्रकारांनाही न्यायाचे दरवाजे बंद झाले आहेत. या कायद्याने उद्योजकांना अधिकार प्रदान केले असून श्रमिकांचे अधिकार मात्र हिरावून घेतले आहेत. पत्रकारांनाही आंदोलन, निषेध करण्याचा अधिकार राहिलेला नाही.

या कायद्याविरोधात देशभर संताप व्यक्त होत आहे. मुंबईत झालेल्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. केंद्र सरकार विरोधात आंदोलन करणारे पत्रकार पाकिस्तानी अथवा चिनी आहेत का? असा सडेतोड सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्राला विचारला होता.

आता या आंदोलनाची मशाल मराठवाड्यात पोहोचत असून उद्या रविवारी बीड येथील बार्शी रोडवर असलेल्या गॅलक्सी लॉन्सवर दुपारी २ वाजता मराठवाडास्तरीय मेळावा होत आहे. या मेळाव्याला एनयूजेच्या राज्याध्यक्ष शीतल करदेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद या सर्व जिल्ह्यातून एनयूजेएमचे पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला पत्रकारांनी मोठ्या संख्येने उभे राहावे असे आवाहन नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट महाराष्ट्र अध्यक्षा शीतल करदेकर, सचिव कैलास ऊदमले, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष डॉ. अब्दुल कदीर, राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य शिवाजी नलावडे आदींनी केले आहे.