यवतमाळ : जिल्ह्यात पोलिओ लसीकरणा दरम्यान 12 बालकांना सैनीटायझर पाजण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील कापसी कोपरी या गावात घडला. 31 जानेवारीला दुपारी लसीकरण झाले. त्यानंतर मुलांना त्रास होऊ लागल्याने सायंकाळी ही बाब लक्षात आली. तातडीने 12 बालकांना यवतमाळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

कोरोना संसर्ग लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून यंदा ही लसीकरण मोहीम पार पाडायची होती. रविवारी घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या कापसी कोपरी येथील लसीकरणाच्या बुथवर एक ते पाच वयोगटातील दोन हजार बालकांसह त्यांचे पालक जमले. लसीकरण सुरू झाले. मात्र काही बालकांना पोलिओ डोस समजून सैनीटायझर चे प्रत्येकी दोन थेंब पाजण्यात आले. रात्री सर्वांना त्रास सुरू झाला. गावाच्या सरपंचानी लसीकरण केंद्रात जाऊन पाहणी केली असता बालकांना पोलिओ डोस नव्हे तर सैनीटायझर चे थेंब पाजल्याचे लक्षात आले.

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मिलिंद कांबळे म्हणाले की हँड सॅनिटायझर मध्ये 70% अल्कोहोल असते. त्याचे काही थेंब तोंडावाटे अत्यल्प प्रमाणात पोटात गेले तरी ते प्राणघातक ठरत नाही. मात्र हे प्रमाणही बालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. असाच प्रकार या प्रकरणात घडला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी देवेंद्रसिंह यांनी रात्री उशिरा रुग्णालयात धाव घेत मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली.

सैनीटायझर पाजणाऱ्या त्या तीन कर्मचाऱ्यांवर सोमवारी सायंकाळी उशिरा निलंबनाची कारवाई करण्यात आली. यात समुदाय आरोग्य अधिकारी अमोल गावंडे, सविता पुसनाके, मसराम या आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.