दिल्ली: कोरोना विषाणूवर (Coronavirus) प्रभावी ठरू शकणाऱ्या सीरम आणि भारत बायोटेकच्या लसींसंदर्भात (Covid-19 Vaccine) आणखी सविस्तरपणे माहिती उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘सीरम’कडून आम्ही लशीच्या आपातकालीन परवानगासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीकडून या लसींसंदर्भात आणखी डेटा उपलब्ध होण्याची गरज बोलून दाखविली आहे.

या तज्ज्ञ समितीने सीरम आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांकडून ही माहिती मागवली आहे. त्यानंतरच लसींच्या आपातकालीन वापरासाठी केंद्र सरकारकडून परवानगी दिली जाईल, असे संकेत मिळत आहेत.

या समितीकडे लसीला मंजुरी देण्याचे अधिकार नाहीत. मात्र, ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (DCGI) या समितीच्या शिफारसी विचारात घेतल्या जातात. त्यामुळे लसीला मंजुरी द्यायची की नाही, हा निर्णयदेखील या विशेष समितीच्या शिफारशीआधारेच घेतला जाईल.


9 डिसेंबरला झालेल्या बैठकीत सीरम, भारत बायोटेक आणि फायझर या तिन्ही कंपन्यांकडून डेटा मागवण्यात आला. ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर लसींना आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्याच्या निर्णयासाठी पुन्हा बैठक होईल.

फायझर’ची लस भारतात वापरण्यासंदर्भात विचार सुरु

‘फायझर’ (Pfizer) कंपनीने भारतामध्येही आपातकालीन वापरासाठी परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. हा प्रस्तावही अद्याप विचाराधीन आहे. ब्रिटनमध्ये गेल्याच आठवड्यापासून नागरिकांना ‘फायझर’ची लस देण्यास सुरुवात झाली.

कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराबाबतची ‘ती’ बातमी खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी नाकारल्याची बातमी खोटी असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांना कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी नाकारली आहे, अशी बातमी काही माध्यमांनी दिली होती. ती पूर्णत: खोटी असल्याचे सांगत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आम्ही परवानगी नाकारली नसल्याचे स्पष्ट केले आहे.