औरंगाबाद । महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळातील विचित्र, असंवैधानिक, गैरकायदेशीर इत्यादी इत्यादी कारभाराचे अनेक किस्से अधून मधून समोर येत असतात. काल-परवापर्यंत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्षांचे कक्षाबाहेर त्यांचे कार्यालयाचा ब्लू कलर मधील बोर्ड अस्तित्वात होता. वक्फ मंडळाचे पैशातून अत्याधुनिक सुविधेसह अध्यक्षांचे कक्ष लाखो रुपये खर्च करून अध्यावत करण्यात आले आहे. अध्यक्षांच्या कक्षेच्या बाहेर लावण्यात आलेला बोर्ड रातोरात गायब झाला असून त्याठिकाणी एक लाल रंगाचा बोर्ड लावण्यात आलेला दिसून येत आहे. त्या बोर्डावर पांढर्‍या अक्षराने उर्दू आणि इंग्रजी मध्ये “रिज़वाना अतीक़ अहमद काज़ी (मग़रबी) मुतवल्लीया, दरगाह, पंचक्की, औरंगाबाद” आणि “तक़ी अहमद क़ाजी (सज्जादानशीन) दरगाह, पंचक्की, औरंगाबाद”  अशी नावे लिहिलेली आहेत.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्षांचे कार्यालयाचे बोर्ड कोणी काढले व हे नवीन बोर्ड कोणी बसवले याबाबत बोर्डातील कोणीही काहीही माहिती द्यायला तयार नाही. सर्व चिडीचुप. बोर्ड तर तसेच लावलेले आहे, परंतु अध्यक्षांच्या कक्षेत बोर्डाचेच कर्मचारी काम करीत असल्याचे दिसून येतात.

माहितीच्या अधिकाराअंतर्गत काढण्यात आलेल्या माहितीनुसार पंचक्की च्या आवारात असलेल्या बाबा शहा मुसाफिर दर्गा, मस्जिद, कब्रस्तान इत्यादींची मालमत्ता ही महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे डायरेक्ट नियंत्रणाखाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने पुरविलेली असताना  त्यावर मुतवल्ली आणि सज्जादानशीन कसे? याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बोर्डावर नमूद नावांबाबत माहिती काढली असता रिज़वाना अतीक़ अहमद काज़ी ह्या नुकत्याच महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सदस्या म्हणून निवडून आलेल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे माजी अध्यक्षांच्या नातेवाईक असल्याचे पण समजले आहे.