मुंबई | राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या आधीच विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. आज या अधिवेशनास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळालं.

परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसान भरपाई व इतर कामांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं, मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांना १ रुपयाही मिळाला नसल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला लक्ष्य केलं.

महिन्याभरापूर्वी दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रवी राणा यांनी अमरावतीमध्ये आंदोलन केलं होतं. यावेळी सुमारे दीडशे शेतकऱ्यांसह आमदार रवी राणा यांना देखील अटक करण्यात आली होती. त्यामुळे या शेतकऱ्यांसह आपली दिवाळी देखील अंधारात गेली असून तिथे नीट सोय देखील करण्यात आली नव्हती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जाब विचारल्यामुळे एक करण्यात आल्याचा आरोप करत रवी राणा यांनी आज ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ लिहिलेला फ्लेक्स परिधान करून निषेध केला.

दरम्यान, ‘राज्य सरकारने १० हजार रुपये हेक्टरी तर, २५ हजार रुपये हेक्टरी फळबागांसाठी देऊ असं सांगितलं होतं. पण अजून पर्यंत २ हजार रुपये हेक्टरी देऊन सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी आमदारांना आणि शेतकऱ्याला जेलमध्ये टाकून दडपशाही करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केल्याचा आरोप देखील राणांनि केला आहे.