मुबई | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कार केल्याची तक्रार मागे घेण्यात आली आहे. यावर भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

धनंजय मुंडेंवर बलात्कार केल्याची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मावर आयपीसी 192 नुसार मुंबई पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

त्यात त्या म्हणाल्या की, ‘खरं तर धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप या रेणू शर्माने लावला ही आमच्यासाठी एक धक्कादायक बाब होती. तसेच आज ही तक्रार मागे घेतली गेली, ते देखील आमच्यासाठी धक्कादायक आहे.’

तसंच, पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट होती. की हे प्रकरण आमच्यासाठी धनंजय मुंडे आणि रेणू शर्मापर्यंत सीमित नव्हतं. या माध्यमातून एक चुकीचा पायंडा आम्ही महाराष्ट्रात पडू देणार नाही. त्यामुळं आम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.