यवतमाळ : दिल्ली मध्येसुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचा दावा भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता. दानवेंना या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रखर टीकेचा सामना करावा लागत आहे. अशातच एका शिवसेना नेत्याने रावसाहेब दानवेंबाबत बक्षीस जाहीर केलं आहे.

रावसाहेब दानवे यांची जीभ कापणाऱ्या व्यक्तीला दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस देऊ, अशी घोषणा यवतमाळ येथील शिवसेनेच्या आंदोलनात विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी केली आहे. यवतमाळमध्ये या बक्षीसाची केलेली घोषणा चर्चेचा विषय ठरत आहे.
रावसाहेब दानवे यांची जीभ जो कोणी कापेल, त्याला आपण लगेच हे 12 लाखांचे वाहन भेट देऊ, त्या क्षणापासून आपण पायी फिरू, वाहन वापरणार नाही, एवढेच नव्हे तर त्याला आणखी दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. शिवाय त्याची रक्ततुलाही केली जाईल, असंही संतोष ढवळे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, दानवेंची जीभ कापण्यासाठी आपण कोणावर अवलंबून राहणार नसून स्वत:ही योग्य संधीची प्रतीक्षा करू आणि हे काम फत्ते करू, असं म्हणत ढवळे यांनी दानवेंना इशारा दिला आहे.